इंद्रायणी नदीच्या पावन तिरावर आज माऊलींनी संजीवन समाधी घेऊन ७१८ वर्षे पुर्ण झाली. आपले परमभाग्य की आज तोच वार आणि तीच तिथी आहे .(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार).
निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही पैठण जवळच्या आपेगावच्या कुलकर्णी यांची मुले. ही चारही भावंड भगवदभक्त होती. 'संन्याशाची पोर' म्हणून गावातील मुले त्या मुलांची हेटाळणी करीत होती. गावकरी मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवलाw नव्हता.
एके दिवशी ज्ञानेश्वर रस्त्याने जात होते. काही विरोधक समोरून येत होते. त्यापैकी एकजण म्हणाला, ''असे कोणते ज्ञान आहे तुमच्या जवळ म्हणून तुला ज्ञानदेव म्हणतात ? ज्ञानदेव हे नाव ठेवल्याने काही ज्ञान मिळत नाही.'' इतक्यात समोरून एक पखालवाला रेडा घेऊन येत होता. त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, ''हा जो रेडा चालला आहे, त्याचे नाव ज्ञाना ठेवले तर त्याला काही ज्ञान येणार आहे का ?'' यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ''माझ्यात आणि रेड्यात काही फरक नाही. ईश्वर सर्व ठिकाणी सारखाच आहे.'' तेव्हा तो विरोधक म्हणाला, ''तुमच्यात आणि त्या रेड्यात काहीच फरक नाही तर त्याच्या मुखातून वेद बोलून दाखव बर !'' ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच तो वेद बोलू लागला. त्या विरोधकाची खात्री झाली की, ज्ञानेश्वर हे अवतारी पुरुष आहेत.
पैठण मधील विद्वान पंडिताकडून शुद्धीपत्र मिळविण्यासाठी ते पैठणास एका ब्राह्मणाच्या घरी राहिले होते. त्या ब्राvvqqह्मणाकडे एकदा त्याच्या वडिलांचे श्राद्ध आले. परंतु श्राद्धास कोणी ब्राह्मण मिळेना. त्याने हे ज्ञानेश्वरांना सांगितले. ते ऐकून ज्ञानेश्वर म्हणाले, ''मी तुमचे पितरच इथे भोजनासाठी आणवितो. तुम्ही स्वयंपाक तयार करावा.'' ब्राह्मणाने सर्व सिद्धता केली. ज्ञानेश्वरांनी त्या ब्राह्मणाचे प्रत्यक्ष पितर बोलावून आणले. पंचपक्वानांचे भोजन, वस्त्रालंकार, दक्षिणा देऊन सर्व कार्य संपल्यानंतर 'स्वस्थाने वासः' असे ज्ञानेश्वरांनी म्हणताच ते पितर अदृश्य झाले. हे वर्तमान पैठणात सर्वत्र पसरले, तेव्हा सर्व विरोधकांना पश्चाताप झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांचा सत्कार केला. 'तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात. तुम्हाला प्रायश्चितची जरुरी नाही.' अशा तऱ्हेचे पत्र त्यांनी लिहून दिले.
ज्ञानेश्वरांनी पैठण येथे केलेले चमत्कार आळंदीच्या लोकांना समजले. साक्षात ईश्वरच अवतरले आहेत असे ते समजू लागले. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ ज्ञानदेवांनी नेवासे येथे लिहिला. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे मराठी भाषेतील धर्मग्रंथरूपी अजरामर लेणेच होय !
आळंदीस विसोबा नावाचा एक कुटील विरोधक होता. तो या चार भावंडांचा खूप द्वेष करीत असे. एकदा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले. तिने सर्व सामान आणले व मांडे भाजण्याकरिता खापर आणण्यास ती कुंभाराकडे गेली. तिथे विसोबा होता. त्याने कुंभारास तिला खापर देऊ नकोस म्हणून बजावले. तो कुंभार विसोबांचा देणेकरी असल्यामुळे त्याला ते कबूल करणे भाग पडले. मुक्ताबाई खिन्न होऊन घरी आली. ज्ञानेश्वरांना म्हणाली, ''मांडे करणार कसे ? कुंभाराने खापर दिले नाही. !'' यावर ज्ञानेश्वर लगेच आपला जठराग्नि प्रदीप्त करून म्हणाले, ''माझ्या पाठीवर मांडे भाज.'' मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे केले. नंतर सर्वजण भोजनास बसले. विसोबा ते दुरून पाहत होता. तो धावत जाऊन त्यांना शरण गेला.
चांगदेव नावाचा एक महान योगी होते. आत्मा ब्रह्मांडी नेण्याची विद्या त्यांना पूर्ण येत असल्यामुळे त्यांनी जगात चौदाशे वर्षे काढली. ते स्वतःला सामर्थ्यवान समजत. आपणासारखा दुसरा कोणी सद्गुरू नाही, असे ते आपल्या शिष्यांना सांगत. ज्ञानेश्वरांविषयी त्यांना कळल्यानंतर त्यांना पत्र लिहावे, असा विचार चांगदेवांनी केला. ते पत्र लिहू लागले. पत्रारंभी 'तीर्थरूप' लिहावे तर ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत. 'चिरंजीव' लिहावे तर त्यांच्यापासून आपणाला आत्म-ज्ञान घेणे आहे. अखेर त्यांनी कोरा कागदच ज्ञानेश्वरांना पाठवून दिला. तो कोरा कागद पाहून ज्ञानेश्वर म्हणाले की, ''गुरु न केल्यामुळे चांगदेव चौदाशे वर्षे कोराच राहिला.'' त्यांनी त्याच शिष्याजवळ उत्तर लिहून दिले की, ''संपूर्ण विश्वाचा चालक तुमच्यापाशी आहे. त्याच्याजवळ लहान-थोर असा भेद नाही.''
ज्ञानेश्वरांचे उत्तर त्या शिष्याने चांगदेवास नेऊन दिले. चांगदेवांनी शिष्य-समुदाय बरोबर घेतला व स्वतः एका वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात धरला. त्या वेळी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई एका भिंतीवर बसले होते. त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा ज्ञानेश्वरांनी भिंतीला आज्ञा केली, संत भेटण्यास येत आहेत. आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे. ती निर्जीव भिंत त्यांना घेऊन चालू लागली. ते दृश्य पाहून चांगदेवांचा अभिमान नाहीसा झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरण धरले. नंतर उपदेश घेतला.
भागवतधर्म मंदिराचा पाया रचुन ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तिरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
माऊली ज्ञानेश्वर माऊली