Sunday, March 1, 2026

संकटकाळीतल एकमेव ढाल:

आई आणि वडील यांच्यासारखे दुसरे दैवत अथवा पर्याय असूच शकत नाही. अशोक , वय वर्ष 32 उंच पुरे शरीर, मजबूत शरीर बांधा, स्वतःवर भक्कम आत्मविश्वास, बायको,मुले सर्व काही सुरळीत. भल्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये कायम मोठ्या पगाराची सरकारी नोकरी , सर्व नियमित आणि चौकटीत सुरू असताना अचानक त्याच्या डोक्यात उजव्या बाजूला किंचितसे ... टिक टिक असे जाणवु लागले होते. कदाचित ते रक्तचापाशी संबंधित असू शकेल. मार्च व एप्रिल महिन्यात कामाचा व्याप जास्तीच असतो. कमी वेळात बरेच काही कार्यालयाचे काम पूर्ण करून द्यावे लागते. त्या अतिरिक्त ताणतणावाची कदाचित ती परिणिती ती असू शकेल. पण त्याच्या उच्चशिक्षित दिमाखात नको ते वाईट विचार येत होते. पुढच्या क्षणी त्याच्याबरोबर काय विपरीत होऊ शकेल या संदर्भात क्षणोक्षणी त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पेन किलर्स औषधी, गोळ्या घेऊन बघितल्या, पण त्यांचा फारसा काही उपयोग झाला नाही. दोन लहान मुले. पत्नी मुलांच्या निस्सिम प्रेमापोटी, पत्नी घाबरून जाऊ नये म्हणून तिला या संदर्भात थोडेसे काही डोके दुखते असे भासविले. त्यादरम्यान काय त्याचे भाग्य, चारशे किलोमीटर अंतरावरून योगायोगाने आई-वडील गावावरून मुलीला भेटण्यासाठी बालसाड ला आलेत. चार दिवसांनी तिच्याकडून मुंबईला मुलाला भेटण्यासाठी अशोककडे देखील आलेत. हेच ते आईवडील ज्यांनी अशोकला आजपर्यंत गरिबी व दुःखाचा स्पर्शदेखील होऊ दिला नव्हता. अशोक त्यांचा एकुलता एक मुलगा. अशोक आता जास्तच विचार करू लागला. त्यांना आपल्या मुलाला अशा केविलवाण्या अवस्थेत बघावे लागेल की काय हाच त्याचा मनात सातत्याने विचारचक्र सुरू होते. अशोक वरवर सामान्य असण्याचा आव आणत होता खरे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याशी गप्पा करत असताना त्याला मात्र राहवले गेले नाही. त्याला होणारा त्रास त्यांना क्षणार्धात सांगून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या इस्पितळात तपासून घेण्याबाबत चे नियोजन करण्याचा त्याच्या वडिलांनी गंभीर सल्ला दिला व त्याला ते स्वतःच इस्पितळात तपासण्यासाठी घेऊन जातील असे ठरले. त्यांनी अगदी छोट्या बाळासारखे त्यास दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या दवाखान्यात नेले व सर्व चाचण्या करवून घेतल्या. चाचण्याअंती गंभीर काळजी करण्यासारखे काही खास निदर्शनास आले नाही. दोन पाच औषधी दिल्या गेल्या. पण त्यादरम्यान आई-वडिलांच्या सहवासाची ऊब अशोक साठी खूपच जगावेगळी होती. लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी त्याची अनेकविध प्रकारे कशी काळजी घेतली त्या संदर्भात त्याच्या मनामध्ये विचारांचे चक्र फिरत होते. सामान्य शेतकरी कुटुंब, आईवडिलना चार अपत्य, त्यात अशोक सर्वात मोठा, आईवडिलांनी दिवसभर शेतात राबराब राबून कुटुंबाची सातत्यानी घेतलेली काळजी, ते सर्व त्याच्या नजरेसमोर येत होते. निसर्ग संकट,शेतमालाला व्यापार वर्गांकडून मिळणारा अन्यायी भाव या सर्व गोष्टी तर विपरीत होत्या. तरी देखील आपल्या मुलाबाळांवर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक छाया पडू देता मुलांना व्यवस्थित मार्गस्थ केले होते. त्यांच्या पारंपारिक विचारसरणीनुसार जीवनाची व्याख्या म्हणजे कष्ट करणे व मुला बाळांचे संगोपन करणे हीच होय, त्या पलीकडे अजून वेगळे विश्व असते असे त्यांना दूरपर्यंत माहीतच नव्हते. त्यांनी सोसलेल्या कष्टाचा एक एक क्षण दररोज अशोक च्या मनामध्ये यायचा. मुलांवरचे मातृ पितृ मूल्य मात्र कधीही कमी झालेले त्याला आठवत नव्हते. निसर्गाची ती एक आगळीवेगळी अशी किमया आहे. आणि आता तर त्याच्या या जीवघेण्या दुखण्याने त्याला दूरवर आई-वडिलांशिवाय कोणीही दिसत नव्हते. त्याच्यासाठी फक्त त्याच सदृश्य प्रतिमा होत्या. थोडक्यात तो कोण आहे याचा त्याला विसरायला झाले होते आणि फक्त घरातील त्या चार चौकटीत आई वडील आणि स्वतः त्याला दिसत होता .पत्नी व मुलांविषयी विचार करणे देखील त्याच्या पचनी पडत नव्हते. थोडक्यात म्हणजे त्याने स्वीकारून घेतले होते की त्याचे थोडेच दिवस शिल्लक असावेत. पण काय ती ईश्वर किमया, आईवडिलांच्या पवित्र सानिध्यामुळे त्याचे ते दुखणे हळूहळू बरे व नंतर नाहीसे झाले. अशोकला बरे वाटायला लागले. आणि तो पूर्ववत बारा झाला. हीच ती मातापित्याची ईश्वरी कृपा. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आपल्याभोवती एक निसर्गशक्ती चे संरक्षक कवच असते, त्यांची काळजी घेणे म्हणजे स्वतःला सुरक्षित करणे हा अशोक चा वास्तविक अनुभव. सरासरी वरील प्रसंग हेच सांगतो की आई-वडील हे ईश्वराचे रूप असून त्यांच्या कष्टांची आणि प्रेमाची जाणीव ठेवणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आयुष्य सुरक्षित राहते. "पैशाने सर्व काही मिळेलपण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही" असे मानले जाते. 'मातृदेवो भवपितृदेवो भव' ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. वडील म्हणजे एक अशी व्यक्तीजी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलांची स्वप्ने पूर्ण करणारी,कुटुंबाचा कणाकष्टाची सावली आणि निःस्वार्थ प्रेमाचे निस्सीम प्रतीक असणारे, मुलांच्या यशाचा आनंद साजरा करणारे आणि अपयशात पाठीशी उभे राहणारे ढाल असतात. आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत, की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करणे शक्य नहीं. आणि त्याची परतफेड केली पाहिजे अशी अपेक्षा ते पण करत नाहीत. त्याचा गौरव म्हणजे तुमचे माझे समाजमान्य वर्तन ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाही. आपल्या आयुष्यात दोनच लोक असे असतात ज्यांच्यावर, ज्यांच्या निर्णयावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. नंतर बोलू किंवा बघू या भ्रमात राहू नका. आजच त्यांच्याशी वेळ काढून गप्पा करा, त्यांची विचारपूस करा. त्यांनी केलेल्या संघर्षमय मेहनत प्रसंगावर चर्चा करा. खूप बरे वाटते त्यांना त्याचा यशस्वी भूतकाळ ऐकायला. काळावर नियंत्रण ठेवण्याएवढे तुम्ही, मी शक्तिवान नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यांचा आदर करून त्यांच्या आज्ञाचे पालन करणे इतकेच नव्हे तर त्यांच्या उतारवयात संपूर्ण काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अनुतात्या ना समर्पित. लेखक: स्नेहयश.