We Have The Most Beautiful World Within Peace Of Mind....Just Try To Understand.... And Feel And Utilize.........It Always Follows You.......!
Tuesday, March 17, 2026
देशाचा विकासाचा केंद्रबिंदू- विद्यार्थी-सद्यस्थिती :
साधन हे आपण कसे वापरतो, त्यावर ते फायदेशिर की वाईट हे अवलंबून असते. भ्रमणध्वनी चे तसेच आहे. भ्रमणध्वनी मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तथापि कोणत्याही गोष्टींचा अति वापर हा वाईटच. तसेच भ्रमणध्वनीच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, त्याच्या आहारी जाण्याचे कोणत्या सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. यावरील हा ऊहापोह.
अलीकडचीच एक ग्रामीण भागातील शालांत विद्यार्थ्यांनी, आपल्या मित्रांना हत्याराने मारल्याची घटना घडली. पालकांनी भलत्यानाच दोषी धरले. पालकांचे बरोबर आहे. परंतु पालकांनी हा विचार केला पाहिजे की, मुलांच्या या वर्तनाला जबाबदार कोण ? या मागची तपासणी केली पाहिजे. मुलांमध्ये एवढा आक्रमकपणा का आला आहे? यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना नंतर शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र एका विचित्र अशा परिस्थितीतून जात आहे. साथीच्या रोगांच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी वापरण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी वापरायला सुरुवात केली. आणि त्याची शैक्षणिक वाताहत सुरू झाली. तसेच त्यासोबत अनेक सामाजिक समस्या देखील निर्माण झाल्या. विद्यार्थी भ्रमणध्वनीच्या इतक्या आहारी गेले आहेत, की ते त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. शेजारील बड्या या देशांमध्ये वयाच्या १८ वर्षापर्यंत मोबाईल आणि सोशल मीडिया वापरायची परवानगी नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आहेत. शैक्षणिक, क्रीडा, संशोधन अशा सर्व क्षेत्रांमध्ये तेथील विद्यार्थी प्रगती करताना दिसत आहेत. मात्र आपल्याकडील विद्यार्थी रील बनवणे, रील बघणे, नाचणे गाणे अशा गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. अगदी लहान वयात मुलांच्या हातामध्ये मोबाईल पडला आहे. विद्यार्थी मोबाईल मध्ये नक्की काय पाहत आहेत, परिणामी याविषयी पालकांना लक्ष ठेवणे शक्य होत नाही. विद्यार्थी नको त्या गोष्टी मोबाईल मधून पाहत आहेत. तरुण वयात विद्यार्थ्यांचे हार्मोन बदलत असल्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक बदलांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. परंतु फार कमी वयात विद्यार्थी मोबाईल मध्ये नको ते पाहत असल्यामुळे हा हार्मोनल असंतुलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विद्यार्थी प्रमाणाबाहेर आक्रमक बनत आहेत. सध्या मुलांबरोबरच मुली देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक बनल्याचे दिसत आहे. शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाहीत. अनेक शाळांमध्ये मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणे कमी होत आहे. व त्यातच भर म्हणून मोबाईलच्या व्यसनामुळे विद्यार्थी मैदानापासून दूर जात आहेत. मैदानावर खेळत असताना हार आणि जीत या दोन गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूपणा जिवंत राहत असे. अशावेळी एखादी हार देखील त्याला पचवता येत असे व त्यातूनच तो नवीन उमेद घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु सध्या खेळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीचा अभाव दिसून येत आहे. तसेच सध्या अनेक पालकांना एक किंवा दोनच अपत्य असतात, त्यामुळे प्रत्येक पालक त्यांचे मोठ्या प्रमाणात लाड करतात त्यांच्या नको त्या मागण्या पूर्ण करतात. विद्यार्थी लहान वयात प्रगत तंत्रज्ञानयुक्त सारख्या महाग वस्तू पालकांकडे मागून त्यांनी न दिल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारे भावनिक खेळ खेळतात. अंततः हताश होऊन पालक त्यांच्या मागण्या पूर्ण करत आहेत. परंतु हा फार मोठे संकट पालक स्वीकारताना दिसत आहेत. याविषयी बऱ्याच पालकांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की आमच्या लहानपणी आम्हाला काही सुविधा मिळाल्या नाहीत. तर त्या आपल्या पाल्यांना मिळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे . यामुळे आता एक मोठा धोका असा दिसून येतो, की विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट मागितल्यानंतर पालक लगेच उपलब्ध करून देतात. त्यामुळे भविष्यामध्ये जर त्यांना पाहिजे ती गोष्ट वस्तू मिळाली नाही तर ते स्वीकारणे त्यांना अवघड जाते. समाजामध्ये आपण यापूर्वी देखील अशी अनेक उदाहरणे पाहिले आहेत की, अतिशय उच्चशिक्षित डॉक्टर, अभियंता ,प्रतिष्ठित व्यक्ती एखादे अपयश पचवू शकले नाहीत, त्यासाठी त्यांना कोणापुढे मन व्यक्त करता आले नाही. व त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचललेले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देत असताना त्यासाठी किती कष्ट पडतात, आपल्याला काय काम करावे लागते. याची त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध होते म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची किंमत राहत नाही. पूर्वीच्या काळी एकाच घरातील सदस्य एकमेकांचे कपडे वापरत असत. मोठ्या भावंडांचे कपडे छोटी भावंडे वापरताना त्यांना आनंद होत असे. परंतु आता एका घरातील सदस्य एकमेकांचे कपडे वापरण्यास कमीपणा समजतात. यासारख्या गोष्टी कमी प्रतीच्या वाटतात. परंतु त्यांचा फार मोठा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे आपल्या पाल्याला नवीन कपडे विकत घेताना आपल्या मोठ्या भावंडाचे लहान झालेले कपडे वापरायला त्याला प्रोत्साहित करणे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी जसे भावंडांमध्ये प्रेम पाहायला मिळत होते, तसे आता ते व्यावहारिक झाले आहे. पूर्वी आपण आपल्या घरातील प्रत्येकाला अन्नपदार्थ मिळेल याचा विचार करत असू परंतु आता दुर्दैवाने असे वातावरण फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे यासाठी देखील पालकांनी लक्ष देणे मुलांना सांगणे गरजेचे आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे पालकांकडे वेळेचा अभाव आहे. ते आपल्या पाल्यास वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे पालक आणि पाल्य यामध्ये थोडीशी दरी निर्माण झाल्यासारखे दिसते. पालक आणि पालक एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करून शकल्यामुळे घरात ताणतणाव निर्माण होतो. पालकांच्या अपेक्षा निश्चितच वाढलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा ते आपल्या पाल्याची तुलना इतर मुलासोबत करतात त्यामुळे यातून पुन्हा वेगळे ताणतणाव निर्माण होत आहेत. यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता अभ्यासून त्याप्रमाणे अपेक्षा ठेवाव्यात पाल्यांच्या आवडीनिवडी सांभाळून त्यांना करिअरसाठी क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी. त्यामुळे आपला पाल्य त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मनासारखे काम करून यश संपादन करू शकेल. शेवटी प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होणे शक्य नाही. याची जाणीव प्रत्येक पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा आपण असे म्हणतो की मुले, मुली ही मोबाईलच्या आहारी गेली आहे, त्यावेळी मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर करायचे असल्यास, पालकांनी देखील आपला स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. घरी असताना जास्तीत जास्त वेळ आपल्या पाल्यांना दिला पाहिजे. मुलांना फक्त सुख सुविधा देऊन त्यांची प्रगती होणार नाही. तर पालकांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या पाल्यांना देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. अनेक वेळा पाल्यांच्या काही गोष्टी आपणास पसंत नसतात परंतु आपण त्यामागील त्यांची भावना समजावून घेणे गरजेचे आहे. तरीही ते आपल्याला चुकीचे वाटल्यास तसे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे गरजेचे आहे. शेवटी आपला निर्णय आपल्या पाल्याला व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितल्यास ते देखील आपले निश्चितच ऐकतील. आता बरीच मुले आणि मुली हे व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या पाल्यास घेऊन व्यायामाचे महत्त्व सांगितल्यास त्यांना ते पटेल. याची सुरुवात प्रत्येक पालकांनी स्वतःपासून केली पाहिजे. म्हणजे स्वतः नियमितपणे व्यायाम करत असल्यास, आपल्या पाल्यांना वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. तसेच खेळासोबत त्यांना एखादी कला जोपासता येत असेल, आवडत असेल तर त्यासाठी प्रोत्साहित करावे. यातूनच त्यांचे कलागुण विकसित होतील व त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून येईल. आपल्या मुलांना आपली संस्कृती समजावी यासाठी आपले किल्ले, ऐतिहासिक स्थळे अशा ठिकाणांना भेटी देऊन, या स्थळांचे महत्त्व समजावून सांगावे. आपण भाग्यशाली आहोत की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज यांच्या राज्यामध्ये राहतो. त्यांचा इतिहास मुलांना सांगून, या इतिहासाच्या माध्यमातून त्यांना देखील निश्चितच प्रेरणा मिळू शकते. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सांगितले होते की, आपला भारत देश 2030 पर्यंत महासत्ता बनू शकेल. परंतु दुर्दैवाने सध्या आपली तरुण पिढी मोबाईल मध्ये इतकी मग्न झाली आहे की, त्यामुळे असा विचार येतो की, त्यांचे ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नातच राहते, की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याबाबत शासनाने देखील विचार करणे गरजेचे आहे. किशोर अवस्थेत मुलांना मोबाईल वापरास बंदी करणे, सोशल मीडिया वापरण्यास बंदी करणे, विविध प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर बंदी करणे, यासारखे तातडीचे उपाय करणे फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यामध्ये ही पिढी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहणार नाही. सध्या जशी विविध व्यसनांसाठी उपचार केंद्र स्थापन केली आहेत. तशी भविष्यामध्ये भ्रमणध्वनी दुष्परिणामामुळे, त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र उभारावी लागतील. असे व्हावे असे वाटत नसेल तर निश्चितच शाळा, पालक आणि पाल्य या तिघांनी गंभीरता पूर्वक विचार करून, एकत्रित प्रयत्न केल्यास असे वाईट दिवस भविष्यातील पिढींना येणार नाहीत, अशी अपेक्षा करूया.
धन्यवाद.
रचना: स्नेहयश.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment