We Have The Most Beautiful World Within Peace Of Mind....Just Try To Understand.... And Feel And Utilize.........It Always Follows You.......!
Sunday, March 22, 2026
श्रद्धा आणि समाज - संस्कार मूल्यांची उणीव:
आपण भारतीय लोकशाही चे पुरस्कर्ते आहोत. देशातील सामाजिक विकासासाठी केलेले हे प्रयोजन नक्कीच उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. परंतु सत्तेच्या केंद्रीकरणामुळे त्याचे काही प्रमाणात नकारात्मक पैलू अलीकडे प्रकाशझोतात येताना दिसत आहेत. सत्तेतील राजकीय असुरक्षितेचे रुपांतरण हे गोष्टीतील 'लाकूडतोड्या' च्या ज्या फांदीवर बसलात त्याच फांदीला तोडायला निघालात अशी परिस्थिती आणि अवस्था दिसते.
उत्तम दर्जाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार जलद गतीने होणे आवश्यक आहे. अर्धवट ज्ञान मानवजातीला संकटात केव्हा नेईल याचा भरवसा नाही.
अलीकडील महाराष्ट्रात गाजणारे 'बाबा खरात' हे ज्वलंत प्रकरण अथवा इतर तत्सम घटित समाजाला संकटात आणणारे विश्र्वासघातकी अनेक उदाहरणे आहेत. अशा या प्रवृत्तीला पोषक वातावरण तयार करणाऱ्यांमध्ये संस्कार मूल्यहीन लोकांचीच भर जास्त असते. बाह्य देखावा हा चिरकाल टिकत नाही. उच्चभ्रू वर्गामध्ये संस्कार मूल्य असतील, मग हे घडतेच कसे? म्हणून तो वर्ग एक प्रमाणित वर्ग आहे, असे आपण का वाटून घ्यायचे ? म्हणूनच समाजातील सामान्य अथवा मध्यमवर्गीय लोकांनी कोणताही निर्णय घेताना प्रत्येक गोष्ट ही चाचपून व निरखून घेतल्यानंतरच त्यात पाऊल टाकावे.
वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन या दोन गोष्टींचा खोलवर अभ्यास केल्यास अथवा त्यांना पूर्णपणे समजून घेतल्यास ९९ % समस्यांचे निवारण होईल यात कवडी मात्र शंका नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपलब्ध सामाजिक चौकट या दोन्हींचा मेळ आवश्यक तसा विणता आला पाहिजे. रक्त, नाते, स्वकीय,आपुलकी आणि समाजजीवन यांच्यामध्ये विज्ञान दृष्टीचे अंगीकारण कशा प्रकारचे असावे यासाठी संस्कार मूल्यांची अत्यंत आवश्यकता दिसून येते. अंधश्रद्धेला, श्रद्धा समजून किंचितही या गोष्टींमध्ये शिरकाव होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा जबाबदार वर्तनामुळे समाजहित जोपासले जाईल यात काडीमात्र शंका नाही. देशाला फक्त हुशार लोकांचीच गरज नाही,
तर संवेदनशील, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिकांची आवश्यकता असते.
आणि त्याची पायाभरणी मूल्य शिक्षणातूनच होते.
वैज्ञानिक दृष्टिकोनात आचार विचार असतात, जी मनुष्याला पशुपासून वेगळी करते. विचार करणे हे मनुष्यत्व आहे आणि संवेदना यांना बळी पडणे पशुत्व आहे. अन्नाची जास्त गरज प्राण्यांना असते त्यामुळे मांसाहार यात रमलेला पशुच असतो पण जो विचारशील असतो तो वैज्ञानिक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असण्यासाठी विचारसशील असणे महत्वाचे असते.
या पिढीच्या जगण्यात प्रचंड विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला विज्ञानयुगाने निर्माण केलेल्या विविध उत्तमोत्तम गोष्टी, समाजमाध्यमं, स्मार्टफोन्स, व स्वयंपाकघरातील उपकरणं हे सारे वापरायचे तंत्रज्ञान म्हणून; परंतु जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा नाही.
शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिकता असूनही स्त्रिया अजूनही रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना बळी पडतात. त्यांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतीकात्मक समर्थन करत समाज त्यांना मागे खेचतो. वैज्ञानिक विचारसरणी, संविधानाचे भान आणि समताधिष्ठित समाजासाठी स्त्रिया व पुरुषांनी मिळून बदल घडवायला हवा.
लोकहितवादी व सत्यशोधक समाज अंतर्गत कार्य करणाऱ्यांनी या समाजातल्या चुकीच्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले तरीदेखील विचारवंतांच्या चळवळीची प्रतिभा कमी पडते की आपल्या विचारांची? या धर्माचे आणि जातीचे तुष्टीकरण करणाऱ्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये अगदी सुशिक्षित स्त्रियांच्याही जीवनातून हद्दपार होत नाहीत, याला काय म्हणावे?
आधुनिक कपडे घालणाऱ्या, आधुनिक केशभूषा, वेशभूषा करणाऱ्या, स्मार्टफोन वापरणारा वर्ग तत्त्वांनी आणि विचारांनी मात्र आधुनिक होताना दिसत नाही. पुन्हा-पुन्हा त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळी पडतात.
सध्याचे राज्यकारण अशाच अंधश्रद्धाळू, भोळसट वर्ग तयार करत आहेत. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात रुजवून या व्यवस्थेला सुरुंग लावायचा आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन, संवाद सुरू करावा आणि आपल्या घरातील स्त्रियांना या चुकीच्या रूढी-परंपरांतून बाहेर काढायला मदत करावी.
आपल्याकडे अडाणी, अल्पशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित सर्वजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात आणि बाळगण्यात सारखेच मागे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहीत नसतो. ज्यांना माहीत असतो; ती जीवनातील घटनांना कार्यकारणभावाचे सूत्र सहसा लावत नाहीत. विचार करण्याची पद्धत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच ही कोंडी फुटू शकते. यासाठी शिक्षणक्षेत्रात प्रत्यक्ष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या अवघा अठरा वर्षांचा तरुण मतदान करतो. आपल्या देशाचे भवितव्य ठरवतो. आपले एक मत म्हणजे स्वत:चे मूल्य असते; परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेत म्हणजेच शालेय व महाविद्यालयीन पातळीवर काहीही प्रशिक्षण मिळत नाही. या पातळीवर शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढ्या प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात सध्याची स्थिती बदलू शकेल.
आपल्या घरी-दारी होणारे आचरण या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली करण्याची सवय प्रत्येकाला लागली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शिकण्याची नाही, तर आपल्या आचरणात आणण्याची बाब आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकात रुजायचा असेल, तर सत्य फक्त माहीत असून चालत नाही, तर ते निर्भयपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आले पाहिजे. जुन्या मतांना बुजून न जाण्याचे धैर्य हे विज्ञानाने दिलेले अपूर्व मूल्य आहे. म्हणजेच विज्ञान हे अंतिम सत्यावर नव्हे, तर सत्याच्या सातत्यावर उभे असते.
थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे कठीण; पण अशक्य नाही. तो शुभाशीर्वादाने प्राप्त होत नाही. कारण कोणत्याही शुभाशीर्वादात सुष्ट किंवा दुष्ट शक्ती नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन उपदेशाने, अध्ययनाने, अध्यापनाने किंवा शारीरिक, बौद्धिक श्रमाने प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्या मनावरील अनेक निरुपयोगी संस्कार, अनेक निरुपयोगी रीतिरिवाज, परंपरा, अहंकार व श्रेष्ठत्वाची भावना इत्यादी कालबाह्य विचारसरणी झटकून टाकली पाहिजे. भारतातील, विविध पातळ्यांवरील प्रश्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहेत. म्हणून शालेय, महावियालयीन व समाज जीवन पातळीवर शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढा प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात आजची स्थिती बदलू शकेल.
रचना:
स्नेहयश.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment